गजानन वाघमारे यांच्या ‘भुकेचा केंद्रबिंदू’ या गज़ल संग्रहाचे प्रकाशन
अनिस सुरैय्या
तालुका प्रतिनिधि महागांव
महागांव: मराठी गज़लेचा गोडवा सातासमुद्रापार पोहोचविणारे प्रख्यात गज़ल गायक पं.भीमराव पांचाळे आणि डॉ. भाग्यश्री पांचाळे गायकवाड यांची ‘आयुष्याचे सार गज़ल’ ही सुश्राव्य गज़ल मैफिल महागांव शहरात आयोजित करण्यात आली आहे.महागांव तालुका पत्रकार महासंघाच्यावतीने महागांव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शुक्रवार ११ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७वाजता हा भावरम्य मराठी,उर्दू गजलांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.महागांव येथील ज्येष्ठ पत्रकार तथा गजलकार गजानन वाघमारे यांच्या ‘भुकेचा केंद्रबिंदू’ या गज़ल संग्रहाचे प्रकाशन यावेळी करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताला प्राधान्य देणारे तहसीलदार अभय म्हस्के यांचा यावेळी नागरी सत्कार करण्यात येणार आहे. उमरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार किसनराव वानखेडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके, भाजपचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, माजी आमदार विजयराव खडसे, माजी आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार नामदेवराव ससाने, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेबराव कांबळे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या माजी उपाध्यक्ष वनमालाताई राठोड, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी ललित कुमार वन्हाडे, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, तहसीलदार अभय म्हस्के, ठाणेदार धनराज निळे, ज्येष्ठ नेते संभाजी नरवाडे, नगराध्यक्ष सुनंदा कोपरकर, ज्येष्ठ नेते रामराव नरवाडे, पत्रकार संजय भगत, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, वनपरिक्षेत्र अधिकारी देवेंद्र मुनेश्वर, सहाय्यक निबंध सुनील भालेराव, तालुका कृषी अधिकारी समाधान धुळधुळे यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभणार आहे. सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असून, मराठी व उर्दू गज़लेवर प्रेम करणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांनी या गज़ल मैफिलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन महागांव तालुका पत्रकार महासंघाच्यावतीने करण्यात आले आहे.
चौकट
पं. भीमराव पांचाळे यांना ‘गज़ल कोहिनूर’ किताब !
गज़ल नवाज पं. भीमराव पांचाळे मागील पन्नास वर्षांपासून मराठी गज़ल गात आहेत. आजवर ३२ पेक्षा अधिक देशात त्यांच्या गज़ल मैफिली रंगल्या आहेत. देश विदेशात त्यांचे लाखो चाहते आहेत. मराठी गज़ल लिहिणारी नवी पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी आजवर शेकडो गज़ल मुशायरे आणि कार्यशाळा घेतल्या आहेत. पं. भीमराव पांचाळे यांच्या गज़ल सेवेची दखल घेत महागांव तालुका पत्रकार महासंघाच्यावतीने त्यांना ‘गज़ल कोहिनूर’ हा खिताब देऊन गौरविण्यात येणार आहे.


