सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात आणि विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रिया चालू झाली असून दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी ४९ अर्जाची विक्री तर १ अर्ज दाखल झाला असून विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल होत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष केंद्रित करणाऱ्या परळी वैजनाथ २३३ विधानसभा मतदारसंघात दि. २२ ऑक्टोबर २०२४ पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली असून पहिल्याच दिवशी ४९ अर्जाची विक्री तर १ उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी निवडणूक प्रक्रियेत कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याची माहिती दिली. १) नामनिर्देशन पत्र परळी वैजनाथ तहसील कार्यालयात विनामुल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नमुना २ ब सोबत नमुना २६ अशा प्रकारे १२ प्रकारची प्रपत्रे उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार असून कोणत्याही उमेदवारा उमेदवारी अर्ज दाखल करताना तीन गाड्यांची परवानगी देण्यात आली आहे. तर प्रत्येक गाडीत उमेदवारांसह फक्त ४ लोकांना प्रवेश मिळणार आहे. अर्ज दाखल करण्यात अडचण येऊ नये म्हणून तहसील कार्यालयात हेल्प डेस्क तयार करण्यात आले असून उमेदवारी अर्जांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर परळी वैजनाथ तहसील कार्यालयाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने तहसील कार्यालयाच्या परिसरात येणाऱ्या लोकांवर आणि वाहनांवर नजर ठेवता येईल. कोणताही अनुचित प्रकार घडू यासाठी ३ पोलिस अधिकारी तथा १५ पोलिस कर्मचारी यांची नियुक्ती परळी वैजनाथ तहसील कार्यालय परिसरात करण्यात आली आहे. उमेदवारांना सकाळी ११ ते ०३ यावेळेत नामनिर्देशन पत्र उपलब्ध करून देण्यात येतील. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १० हजार रुपये अनामत रक्कम तर अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ०५ रूपये अनामत रक्कम निवडणूक आयोगाकडून ठरवून दिली असून २३३ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने ४० लाखांपर्यंत निवडणूक खर्चाची मर्यादा घातली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी दिली. दरम्यान निवडणूक काळात परळी वैजनाथ तहसील कार्यालयात सकाळी ११ ते ३ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून शहरातील व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांनी दुपारी ३ वा. च्या नंतर तहसील कार्यालयात यावे असे आवाहन करण्यात आले असून यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसीलदार बाबुराव रूपनर याप्रसंगी उपस्थित होते.








