वृत्तसंस्था : सध्या देशात करोना रुग्णांची संख्या कमी झाली असून सर्व निर्बंध शिथील झालेले आहेत. मात्र आता तेलंगणा राज्यात ओमिक्रॉन विषाणूचा उपप्रकार बीए-५ ची लागण झालेला एक रुग्ण सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही व्यक्ती ८० वर्षीय असून त्याचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. विशेष म्हणजे या व्यक्तीने करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. INSACOG या जिनोम सिव्वेंसिंग करणाऱ्या संस्थेने याची पुष्टी केली आहे. ओमिक्रॉम विषाणूचा उपप्रकार बीए-५ ची लागण झालेल्या तेलंगणा येथील व्यक्तीला सध्या सौम्य लक्षणे जाणवत आहेत. याआधी ओमिक्रॉनच्या बीए-४ आणि बीए-५ या उपप्रकारांमुळे दक्षिण आफ्रिकेत करोनाची पाचवी लाट आली होती. त्यांतर या उपप्रकराचा फैलाव युनायटेड स्टेट्स तसेच युरोपीय देशांमध्ये पसरला होता. याच कारणामुळे युरोपीय रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागाने ओमिक्रॉनच्या बीए-५ या उपप्रकाराला चिंताजनक म्हटलं आहे तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही या उपप्रकाराला दखलपात्र आणि चिंताजनक असल्याचे म्हणत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.










