मुंबई : कोरोनाच्या तिन्ही लाटा, कोरोनाचा व्हेरिएंट ओमायक्राॅनवर मात करण्यात आल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला असतानाच युरोप, ब्रिटन आदी देशांत थैमान घालणाऱ्या एक्सई व्हेरिएंटचा आणखी एक रुग्ण मुंबईत आढळला आहे. ६७ वर्षीय सांताक्रूझ येथील रहिवासी असलेल्या बाधित रुग्णाची फाॅरेन ट्रॅव्हल हिस्ट्री नसून गुजरात वडोदरा येथे कामानिमित्त गेला असता कोरोना पाॅझिटिव्ह आला होता. त्याच दरम्यान त्याठिकाणी ब्रिटीश नागरिकांच्या संपर्कात आल्याने त्याची जिनोम सेक्वेंसिंग चाचणी केली. या चाचणी अहवालात त्याला एक्सईची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एक्सई व्हेरिएंटने मुंबईच्या चिंतेत भर पडली आहे. सांताक्रूझ येथील रहिवासी असलेला व्यक्ती कामानिमित्त पत्नी सह गुजरात वडोदरा येथे गेला होता. यावेळी दोन ब्रिटीश नागरिकांबरोबर बैठक झाली. बैठक संपल्यानंतर त्या व्यक्तीला हलकासा ताप आल्याने त्या व्यक्तीने तेथील खाजगी लॅब मध्ये चाचणी केली असता त्याचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला. त्यानंतर १३ मार्च रोजी मुंबईत आल्यानंतर त्याची मुंबईत जिनोम सेक्वेंसिंग चाचणी केली. जिनोम सेक्वेंसिंगच्या अहवालातून त्याला एक्सई व्हेरिएंटची लागण झाल्याचे पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
६७ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या पत्नीसह घरातील नोकर, दोन ब्रिटीश नागरिक यांची चाचणी करण्यात आली. या चाचणीत घरातील व्यक्तीसह नोकर सगळे निगेटिव्ह आले आहेत. मात्र एक ब्रिटीश नागरिक पाॅझिटिव्ह आला आहे. परंतु पाॅझिटिव्ह ब्रिटीश नागरिक आपल्या देशात निघून गेला. मात्र ब्रिटिश नागरिक वडोदरा येथे आणखी कोणाच्या संपर्कात आला असल्यास धोका वाढण्याची शक्यता आहे.