मुंबई : राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या आज, सोमवारी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत होत आहे. महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान असताना, भाजपाने पुन्हा आघाडीला तडाखा देऊन सरकार स्थिर नाही, हा संदेश देण्याची योजना आखली आहे. या निवडणुकीत ‘अकरावा’ म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता आहे. सकाळी नऊ वाजता मतदानास सुरुवात झाली आहे.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेतील एक जागा रिक्त आहे तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळण्याची शक्यता मावळली आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २५ ते २६ मतांची आवश्यकता असेल. गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्यता वर्तविली जाते. राज्यसभेत राजकीय पक्षांची मते फुटली नव्हती. पण, विधान परिषदेत काहीही होऊ शकते, हे साऱ्याच पक्षांचे नेते सूचित करीत आहेत.