सतिश मवाळ
प्रतिनिधी
मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्प कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत काहीच ठोस उपाययोजना होणार नसेल तर त्या शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धीच्या भावाने विकत घेऊन मोबदला तात्काळ द्या अशी संतप्त मागणी शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी दि.२६ जून रोजी पेनटाकळी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या बैठकीत केली.
बैठकीत आ. संजय रायमुलकर अधिकाऱ्यांच्या उडवाउडवीच्या उत्तरावर जाम भडकले. ते म्हणाले की २०१२ पासून शेतकरी पाझरणाऱ्या पाण्यामुळे त्रस्त आहे. चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तरीही अधिकारी मंडळी एकमेकांच्या विभागावर जबाबदारी झटकत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. जोपर्यंत ० ते ११ कि.मी.बंद पाईपलाईन होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.कँनालचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ही समस्या आहे. याला जबाबदार कोण ? कारवाई कोणावर करायची ? असा सवाल सुध्दा आ.रायमुलकर यांनी यावेळी उपस्थित केला. जर पाझरणारे पाणी थांबवता येत नसेल तर पेनटाकळी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धीच्या भावाने खरेदी कराव्या व शेतकऱ्यांना मोबदला द्यावा. अशी मागणी आ. रायमुलकर यांनी केली. लवकरच या विषयी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेणार असल्याचे सुध्दा त्यांनी सांगितले.बैठकीला उपजिल्हा प्रमुख तथा पाणी वापर संस्था महासंघ अध्यक्ष राजेंद्र गाडेकर,सभापती माधवराव जाधव, सभापती दिलिपबापू देशमुख, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर,कार्यकारी अभियंता एस.डी.राळेकर व अनेक अधिकारी म्हणून कर्मचारी उपस्थित होते.










