अमरावती : जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाचे सलग प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्या यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला आहे. भाजप उमेदवार राजेश वानखडे यांनी 7617 मतांनी त्यांचा पराभव केला. राजेश वानखडे यांना 99,664 मते मिळाली. तर ठाकूर यांना 92,047 मतांवर समाधान मानावे लागले. तिसऱ्या क्रमांकाची 6710 मते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मिलिंद तायडे यांनी घेतली. तर बसप उमेदवार डॉ. मिलिंद ढोणे हे 1073 मतांसह चौथ्या स्थानावर आहेत. तिवसा मतदारसंघात यावेळेस महायुतीतील भाजप आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस यांच्यात थेट लढत होती. 2019 च्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी राजेश वानखडे यांचा 10 हजार 361 मतांनी पराभव केला होता. या पराभवाचा वचपा 2024 च्या निवडणुकीत वानखडे यांनी काढला आहे.
काँग्रेसला मोठा धक्का
विशेष म्हणजे यशोमती ठाकूर यांचा पराभव होऊच शकत नाही, असे वातावरण विधानसभा निवडणुकीत तयार झाले होते. मात्र राजेश वानखडे यांनी मागील निवडणुकीतील आपल्या मतांना कायम ठेवत ठाकूर यांचा पराभव केला. यशोमती ठाकूर यांचा पराभव अनाकलनीय असल्याचे बोलले जात आहे. तिवसा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली होती. या सभेनंतर धार्मिक ध्रुवीकरण, ‘बटेंगे तो कटेंगे’ यासारख्या नाऱ्याचा जोरदार प्रचार राजेश वानखडे यांच्या प्रचारादरम्यान करण्यात आला होता. तर यशोमती ठाकूर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीदेखील तिवसा मतदारसंघात सभा घेतली होती. यशोमती ठाकूर ह्या राहुल ब्रिगेड मधील महत्त्वपूर्ण नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा झालेला पराभव जिल्ह्यातील काँग्रेससाठी मोठा फटका असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे मोदी लाट असताना देखील 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी सलग आपला गड कायम ठेवला होता. मात्र 2024 च्या निवडणुकीत कुठलीही लाट नसताना त्यांचा झालेला पराभव अनाकलनीय असल्याचे बोलले जात आहे.