पटना – महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये राजकीय भूकंप घडला आहे. याठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे. जेडीयू आमदार, खासदारांच्या बैठकीनंतर नितीश कुमारांनी(Nitish Kumar) राज्यपालांची भेट घेतली. नितीश कुमारांच्या राजीनाम्यामुळे बिहारमधील सरकार कोसळलं आहे. आता राज्यात नवीन राजकीय समीकरणं उदयास आली आहेत. जेडीयू बैठकीत नितीश कुमार म्हणाले की, भाजपानं नेहमी आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली. भाजपानं जेडीयू पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमारांनी राजीनामा दिल्यानंतर आता महाआघाडी सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात आरजेडीचे तेजस्वी यादव हे राज्यपालांच्या भेटीला पोहचणार आहेत. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा उद्याच पार पडण्याची शक्यता आहे. जेडीयूच्या बैठकीनंतर नितीश कुमारांनी भाजपासोबत आघाडी तोडत असल्याची घोषणा केली. बिहारमध्ये सध्याची परिस्थिती
बिहारमध्ये एकूण २४३ सदस्य संख्या आहे. याठिकाणी बहुमत सिद्ध करण्यासाठी १२२ सदस्यांची गरज आहे. सध्याचं चित्र बिहारमध्ये सर्वात मोठी पार्टी आरजेडी आहे. त्यांच्याकडे ७९ आमदार आहेत. तर भाजपाकडे ७७, जेडीयू ४५, काँग्रेसकडे १९, कम्युनिस्ट पार्टीकडे १२ आणि एआयएमआयएम १, हिंदुस्तानी आवाम मोर्चा ४ यासह इतर अपक्ष आमदार आहेत.
जेडीयूकडे ४५ आमदार आहेत तर सरकार बनवण्यासाठी त्यांना ७७ आमदारांची गरज आहे. मागील काही दिवसांत जेडीयू आणि आरजेडी यांच्यात जवळीक वाढली आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर महाआघाडीकडे १२४ संख्याबळ आहे जे बहुमतापेक्षा जास्त आहे. या आघाडीत काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टीही सहभागी होऊ शकते. असे झाल्यास महाआघाडीकडे १५५ पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ असेल.
नवं सरकार कसं असेल?
नितीश कुमारांनी भाजपाशी युती तोडल्यानंतर आता आरजेडी सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. तेजस्वी यादव हे नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यास तयार आहेत. तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रिपदासह गृह खाते स्वत:कडे ठेवतील. त्याचसोबत नव्या विधानसभेचे अध्यक्ष आरजेडीचे असतील. गृहखाते जेडीयू नेहमी त्यांच्याकडे ठेवते परंतु नव्या सरकारमध्ये ते आरजेडीकडे जाण्याची शक्यता आहे.